पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)   

सिंधू नदी पाणी वाटपाचा करार रद्द करणे कितपत सोपे किंवा अवघड आहे हे लवकरच कळेल. मात्र पाकिस्तान दहशतवादास पाठिंबा देत आहे ही बाब या कृतीने अधोरेखित झाली आहे हेही महत्त्वाचे आहे. 
 
पहलगाम  येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामागे नेमके कोण आहेत हे केंद्र सरकारने कृतीने दाखवून दिले आहे. पाकिस्तान बरोबरचा सिंधू नदी पाणी वाटपाचा करार स्थगित ठेवण्यात आला आहे. भारतातील पाकिस्तानी दूतावा सातील लष्करी सल्लागारांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अटारी सीमा बंद करण्यात आली आहे, पाकिस्तानी नागरिकांना ‘सार्क’ योजनेखाली देण्यात आलेले व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि तो मिळालेल्या व्यक्तींना तातडीने भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानात असलेल्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचार्‍यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे. भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानने अपेक्षेप्रमाणे गळा काढला आहे. पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याशी आपला काही संबंध नसल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. ’सर्व प्रकारचा व कोठेही होणारा दहशतवाद आम्ही नाकारतो’ असा साळसूदपणाचा आव पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांनी आणला आहे. मात्र त्यावर विश्वास कोण ठेवणार? पहलगाम मधील हल्ल्याने केंद्र सरकारही चकित झाले. त्या नंतर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या(सीसीएस) बैठकीत वर उल्लेख केलेले निर्णय घेण्यात आले. त्याला काही आधार नक्कीच आहे.

लष्करी कारवाईही शक्य

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा ‘सीमेपलीकडे’ संबंध असल्याचे ‘सीसीएस’च्या बैठकीत नमूद करण्यात आले. त्यात पाकिस्तानचा नामोल्लेख नाही. पुलवामा येथे २०१९ मध्ये जवानांवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्याही वेळी पाकिस्तानचे नाव घेण्यात आले नव्हते, मात्र बालाकोट येथील अतिरेक्यांचे तळ हवाई दलाच्या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्याही वेळी पाकिस्तानी राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्यात आली होती व भारताने  इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातील आपले कर्मचारी निम्म्याने कमी केले होते. त्यावेळी ११० वरून ५५ वर संख्या आली होती. या वेळी ती ३०वर आणली आहे. या कारवाईने पाकिस्तानला धक्का नक्कीच बसला आहे. भारताची ही कृती ‘बेजबाबदारपणाची’ असल्याची ओरड ते करत आहेत. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी त्यावर विचार करण्यासाठी बैठकही बोलावली. पाकिस्तानचे उप पंतप्रधान इसहाक दर यांनी भारताची कृती ‘घाईने केलेली’ व ‘अपरिपक्व’ असल्याचे म्हटले आहे.पहलगामचा हल्ला ‘कोणी तरी केला व त्याचा दोष आपल्या माथी मारला’ जात असल्याचा (फॉल्स फ्लॅग ऑपरेशन) कांगावाही आता पाकिस्तानने सुरु केला आहे. मात्र  प्राथमिक माहितीनुसार  हल्ल्यात ‘परदेशी’ हल्लेखोर सामील असल्याचे उघड झाले. हे परदेशी पाकिस्तानी किंवा अफगाण असू शकतात. अफगाणिस्तानातून पाकिस्तानला अतिरेक्यांचा पुरवठा होत असतो. त्यांना ते ‘जिहादी’ म्हणतात. पहलगाम मध्ये हल्ला करणार्‍यांना शोधून काढू व त्यांना कठोर शिक्षा देऊ असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी म्हटले आहे. त्याचा अर्थ लष्करी कारवाई देखील शक्य आहे. ‘सीसीएस’च्या बैठकीत ‘सर्व पर्यायांवर’ चर्चा झाल्याचे समजले आहे. बालाकोटच्या कारवाईनंतर पाकिस्तानी विमानेही राजौरीपर्यंत आली होती. तसा तणाव व संघर्ष  केंद्र सरकार यावेळी टाळेल. बदललेल्या भू राजकीय परिस्थितीचा विचार करता अमेरिका, सौदी अरेबिया या देशांना माहिती दिल्यानंतर भारत लष्करी कारवाई करेल असे मत संरक्षण  क्षेत्रातील काही  तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर हल्ला झाल्यानंतर भारताने अनेक देशांना त्यात पाकिस्तानचा सहभाग कसा आहे हे सांगितले होते. अशा राजनैतिक मार्गाचा अवलंब आता पुन्हा करावा लागेल. पाकिस्तानने कितीही थयथयाट केला तरी तो देश दहशतवादाचे ‘केंद्र’ आहे हे जगासमोर पुन्हा आणणे भाग आहे. त्यासाठी सज्जड पुरावे सादर करावे लागतील. केंद्र सरकारने केलेली कारवाई हा पाकिस्तानला दिलेली इशारा आहे. आता पुढील कारवाई चतुराईने करणे देशास भाग आहे.
 

Related Articles